"मला पंख असते तर" कल्पनात्मक मराठी निबंध
" मला पंख असते तर.." हा एक कल्पनात्मक निबंध आहे. कल्पनात्मक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीची कल्पना करायची असते. खाली दिलेला " मला पंख असते तर.." हा निबंध कल्पनात्मक निबंधाचे एक उदाहरण आहे.
मला पंख असते तर.. मी पक्षी असतो तर....
उन्हाळ्याचे दिवस होते. संध्याकाळी घरात बसवत नव्हते म्हणून आईजवळ हट्ट केला आणि आईला घेऊन एका बागेत जाण्याचा निर्णय घेतला.. मी प्रथम पशुपक्ष्यांच्या पिंजऱ्यातील वेगवेगळ्या रंगांचे पक्षी पाहण्यात गुंग झालो. त्यावेळी वाटले
“आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा"
या पिंजऱ्यात कोंडलेल्या पक्ष्यांचे स्वातंत्र्य माणसांनी हिरावून घेतले, याचे खूप वाईट वाटले. मी त्या पिंजऱ्यातील पक्ष्यात स्वत:ला शोधू लागलो. तेव्हा मला वाटले मी पक्षी असतो, मला पंख असते तर.. मी असा पिंजऱ्यात अडकून राहिलोच नसतो. सर्व बंधने झुगारून उंच भरारी घेतली असती, मानवाने केलेला अन्याय झटकला असता आणि भुर्रकन उडून गेलो असतो.
मला पंख असते तर 'सुजलाम् सुफलाम् मलयज शितलाम्' अशा आशेतून हिमालया पर्यंतचा भारत उंचच उंच भरारी घेऊन पाहिला असता. भारताचा स्वर्ग गणला जाणारा, हिमालयाच्या कुशीत वसलेला जम्मू काश्मीरचा निसर्ग पाहून येईन, येता येता अमरनाथ व वैष्णोदेवीची सुध्दा यात्रा करीन. भारताची राजधानी पाहीन. त्यासाठी जाण्या-येण्याचा कोणताही खर्च होणार नाही, ना कुठली दगदग होणार नाही. आज इथे तर उद्या तिथे. मिळेल तो चारा-पाणी खाऊन मी मस्त मजेत धुंद होऊन सारा परिसर पाहून येईन. वेगवेगळ्या फळांचा आस्वाद घेईन, वेगवेगळी वृक्षरानी कशी सुंदर, दिमाखात उभी आहे ते पाहीन, गंगा यमुनेच्या खोऱ्यातील, नर्मदा नदीच्या तीरावरील, गोदावरीच्या परिसरातील विविध संस्कृती, खेळ, आहार यांचे निरीक्षण करेन, दक्षिणेस असलेल्या तिन्ही समुद्रांनी निमुळता झालेला भारताचा शेवटचा भूभाग पाहीन, कन्याकुमारीचे दर्शन घेईन. अस्तास जाणाऱ्या सूर्याचा आणि पुन्हा प्रसन्नपणे मानवाला ऊर्जा देणाऱ्या सूर्योदयाचा देखावा पाहीन. उंचच उंच नारळी पोफळीची वृक्षे पाहीन. तिरूपती, म्हैसूर, बेंगलोर, उटी अशी छान सहल करून येईन. सह्याद्री रांगा, पूर्वघाट पाहीन. समुद्रस्नान करेन. भारतातील सर्व क्षेत्रातील विविधता पाहून, भारताचे रसिकतेचे दर्शन झाल्यानंतर दूर देशी जाईन. इंग्लंड, अमेरिका, जपान या देशातील प्रेक्षणीय स्थळे पाहून येईन. पंखांच्या जोरावर आत्मविश्वासाने उंच गरूडझेप घेऊन आकाशातून भारत कसा दिसतो ते पाहीन. अवकाशात सुनीता विल्यम्सप्रमाणे झेप घेऊन ढग, तारे. इंद्रधनुष्य, नक्षत्रे पाहून येईन.
मला पंख असते तर मी विहार करीतच, संचार करीतच जग पाहिले असते. ना शाळा, ना परीक्षा, ना अभ्यास ,मज्जाच मज्जा आली असती. माझ्या पंखात बळ आणण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करेन आणि जगाचा फेरफटका मारून येईन. पंखांवरून, पक्ष्यावरूनच राईट बंधूना विमानाची कल्पना सूचली असे म्हणतात. पक्ष्याचे महत्त्व अवर्णनीय आहे. पक्ष्यांचे जीवन स्वच्छंदी आणि स्वैर असते म्हणून 'पक्षी जाय दिगंतरा' असे म्हणतात, त्यांना दिशांच बंधन नसतं.
कवि बा. सी. मर्डेकर यांच्या एका कवितेत
“सथ बिलंदर लाटांमधुनी
सागर पक्षी सूर्य वेचती "
त्या सागरपक्ष्याप्रमाणे, पहिल्या पावसाची ओढ लागलेल्या चातकाप्रमाणे, आगमन झालेले आहे हे सांगण्यासाठी कोकिळेची तान ज्याप्रमाणे वातावरण नादमय करून सोडते तशी प्रसन्नता मी निर्माण करेन. मला पंख असते तर मी गरजवंतांना मदतीचा हात देईन, हॅरी पॉटरच्या जादूई दुनियेत मी सुद्धा दिसलो असतो.
मला पंख असते तर, इतर पशुपक्ष्याच्या कळपात, नदी सरोवरातील जलचर प्राण्यांच्या सहवासात काही काळ घालवेन, त्यांची सुख-दुःखे जाणून घेईन. मला पंख असते तर विविध रंगांच्या, विविध प्रकारच्या सुंदर सुंदर, मनमोहक अशा शिरपेचात मी दिमाखाने दिसलो असतो. ज्या प्रमाणे श्रीकृष्णाच्या मुकुटात मोरपीस शोभून दिसते. पंख हे प्रगतीचे, प्रेरणेचे प्रतीक आहे. पंखात जेवढे बळ तेवढी जास्त उंच भरारी मारता येते. म्हणून प्रत्येक पक्षी आपल्या पिलांना पंखात ताकत आणि उडण्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात, त्याप्रमाणे मी सुद्धा खूप खूप प्रयत्न करून आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करून आत्मविश्वासाने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उंचच उंच भरारी घेऊन आकाश ठेंगणे केले असते, हे केंव्हा ? जर मला पंख असते तर...
मला पंख असते तर
आकाशाला गवसणी घातली असती ।
नव नवी क्षितीजे पार करून
विश्वाची सैर केली असती ।।
Comments
Post a comment