" कवी नसते तर.." कल्पनात्मक मराठी निबंध
लहानपणापासून मला कविता खूप आवडतात. विशेष करून केशवसूत, कुसुमाग्रज, भा.रा.तांबे, माधव ज्युलियन, ग.दि.माडगूळकर, पद्मा गोळे यांच्या कविता आवडतात. कारण मला माझ्या वक्तृत्वात आणि निबंधलेखनात यांच्या कवितांनी सौंदर्य निर्माण करता येते. पण हे सौंदर्य ज्यांच्या कल्पनाशक्तीतून निर्माण होते, ते कवी रसिकांच्या मनाचा ठाव घेतात, मनाला प्रेरणा देतात, आत्मविश्वास निर्माण करतात, धीर देतात, मनोरंजन करतात, मार्गदर्शन करतात. मग अशा कविता नसत्या तर ? हा प्रश्न पडल्यास त्यास काय उत्तर? कविता या कवींमुळेच आणि कवी नसते तर ? कवि केशवसुतांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास
'आम्हाला वगळा गतप्रभ क्षणी होती तारांगणे
आम्हाला वगळा विकेल कवडी मोलावर हे जीणे"
कविता म्हणजे तरी काय असते? मनातील भावभावनांचे, सुख- दुःखाचे शब्दचित्र कागदावर उमटविले की कविता तयार होते. उत्स्फूर्त भावनांचा उद्रेक म्हणजे कविता. एका संवेदनशील मनातील हळवा, भावूक हुंकार म्हणजे कविता. अशा कविता आणि कवी नसतेच तर,
'एक तूतारी द्या मज आणूनी
फुकिन मी जी स्वप्राणाने
भेदूनी टाकिन सगळी गगने,
दीर्घ तिच्या त्या किंकाळीने "
असे म्हणणारे आद्य आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसूत नसते तर समाजजागृती झाली नसती.
महर्षि वेदव्यासांनी महाभारत, वाल्मीकींनी रामायण, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी, वामनपंडितांची यथार्थदीपिका, रामदासांचा दासबोध, तुकारामांची गाथा, नामदेवांचे अभंग हे काव्यरूपी इमारतीचे आधारस्तंभ आहेत आणि आजही ते मानवासमोर, कवींसमोरचे आदर्श आहेत. ते आणि त्यांच्या कविता मानवाला शिकवण देणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या आहेत. त्यांच्या कविता नसत्या तर मानवाला विवेकबुद्धी, चेतना, प्रेरणा मिळाली नसती. माणसाचा विकास झाला नसता. त्यांच्यामुळे मानवी मनाची मशागत झाली नंतर, संतकाव्य, पंडिती काव्य आणि शाहिरी काव्यानंतर आजच्या नवकविता सुद्धा मनाला मोहिनी घालतात. कविता या उत्साह देणाऱ्या जशा असतात तशाच आत्मचिंतन करायलाही लावणाऱ्या असतात.
अरे संसार संसार
जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके
तेंव्हा मिळते भाकर
संसाराचा गाडा हाकत असताना, आलेल्या संकटांना तोंड देत असताना एका संवेदनशील कवयित्रीचा त्यांच्या कवितेचा जन्म होतो त्या म्हणजे बहिणाबाई चौधरी. त्यांच्या कविता अंतर्मुख करायला लावतात.
कवितेची आवड प्रत्येकालाच असते कारण माणसाच्या आयुष्याची सुरुवात कवितेपासून होते. लहान बाळाला अंगाई गीत गाऊन जोजवणारी आई बाळाला पाळण्यातच कवितेची ओळख करून देते. कविता नसत्या, कवी नसते तर मानवी जीवन वाळवंटाप्रमाणे अतिशय रूक्ष वाटले असते. मानवाच्या प्रकाशाचा एक कवडसा, ज्याप्रमाणे अंधारात दिशा दाखवतो त्याप्रमाणे कविता आणि कवी दिशादर्शक असतात. सैनिकांच्या उत्साहाचा एक भागही कविता असते. कदम कदम बढाए जा या समरगीतामुळे मिळालेल्या आत्मविश्वासामुळे आझाद हिंद सेनेने शहीद आणि स्वराज्य ही बेटे जिंकली. कुसुमाग्रजांनी कोलंबसाचे गर्वगीत लिहून माणसांचा आत्मविश्वास वाढविला, मात करण्याची प्रेरणा अशा प्रकारच्या कवितामधून मिळत असते.
कवी नसते तर कविता नाही, काव्य नाही, गाणं नाही, बजावणं नाही, संगीत ना संगीतकार ना गायक, लता, आशा, उषा, हृदयनाथ, किशोर कुमार, रफी हे कुणी गायक निर्माण झालेच नसते. चित्रपट लोकप्रिय झालेच नसते. कवी नसते तर स्वर्ग, नरक कल्पनासुद्धा आल्या नसत्या.
Comments
Post a comment