राष्ट्रध्वज्याचे मनोगत आत्मकथानात्मक मराठी निबंध
राष्ट्रध्वज्याचे मनोगत : मी राष्ट्रध्वज बोलत आहे..
अजिंक्य भारत, अजिंक्य जनता
ललकारत सारे
ध्वज विजयाचा उंच धरा रे
उंच धरा रे ।।
हे योगेश्वर अभ्यंकर यांचे गीत आम्ही अगदी उत्साहाने, जल्लोषाने, स्फूर्तीने सादर केले. आमच्या हातात ध्वज होता. त्या ध्वजाकडे सर्वाचे लक्ष होते. आमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची काळजी आमचे मार्गदर्शक घेत होते. गीत संपल्यानंतर आम्ही आमच्या जागेवर जाऊन बसलो. प्रशालेच्या प्रांगणात, मध्यभागी अगदी दिमाखाने राष्ट्रध्वज फडकत होता, भाषणे चालली होती. इतक्यात माझ्या हातातील ध्वज मला काहीतरी सांगण्याच्या मन:स्थितीत होता हे मी जाणले आहे. त्याची कहाणी मी एकू लागलो.
आपला भारत देश स्वतंत्र होण्यापूर्वी अनेकांनी जिवाची पर्वा न करता हौतात्म्य पत्करले, असीम त्याग केला, आपले प्राण वेचले त्यांच्या महान त्यागामुळेच स्वातंत्र्यरूपी सूर्याचा उदय झाला. लॉर्ड माऊंट बॅटन योजनेनुसार भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली. नवी दिल्ली येथील संसद भवनात १४ ऑगस्टच्या मध्यरात्री बाराचे ठोके पडले आणि भारताचे पारतंत्र्य संपले. भारत स्वतंत्र झाला. ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली उतरवून आपला तिरंगा म्हणजेच मला अगदी दिमाखदार सोहळ्यात फडकविण्यात आले आणि ते सुध्दा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते. मला अतिशय आनंद झाला. भारतासारख्या महान देशाची शान आणि मान मला मिळाला होता. या अत्यानंदात मी न्हावून निघालो होतो.
प्रत्येक राष्ट्राची स्वतंत्र अशी एक खूण असते, निशाणी असते, प्रतीके असतात. तशाच प्रकारचे एक भारताचे प्रतीक म्हणजे मी तिरंगा आहे. माझा आकार आयताकृती आहे. त्यावर समान रुंदीचे तीन रंगांचे पट्टे आहेत. सर्वात वरचा पट्टा केशरी रंगाचा आहे आणि हा रंग त्यागाचे, शौर्याचे, पराक्रमाचे प्रतीक आहे. भारतातील अनेकांच्या प्रयत्नातूनच हे स्वातंत्र्याचे सूख मिळाले आहे. मधला पट्टा पांढऱ्या रंगाचा आहे. तो शांततेचे प्रतीक आहे आणि या पट्ट्यातच निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे. त्यावर २४ आरे आहेत. गतीचे, प्रगतीचे प्रतीक आहे आणि खालचा हिरवा पट्टा हा आपल्या वसुंधरेच्या 'सुजला सुफलाम्' अशा नवनिर्मितीचे प्रतीक आहे. अशा प्रकारे मी शौर्य, त्याग, शांती आणि समृद्धी यांचा संदेश देतो. मी आपला राष्ट्रध्वज म्हणूनच स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. भारतीय संविधान समितीने २२ जुलै १९४७ रोजी हा राष्ट्रध्वज संमत केला. ध्वज हे आपल्या राष्ट्रीय अस्मीतेचे प्रतीक असते म्हणूनच ध्वजाला वंदन हे राष्ट्राला वंदन असते. माझ्या या महत्त्वाने अनेक जण प्रेरित झाले आहेत व काव्यरचना ही केलेली आहे.
विजयी विश्व तिरंगा प्यारा
झंडा ऊंचा रहे हमारा ।।
हे झंडागीत खूप प्रेरणादायी आहे. कोणतेही देशभक्तिपर गीत असो किंवा राष्ट्रीय नेत्यांची चरित्रे असो किंवा राष्ट्रीय सण असो, त्यातून सर्व भारतीयांना देशप्रेमाची शिकवण मिळत असते. अनेक राष्ट्रपुरुषांच्या आत्मचरित्रात स्वातंत्र्यापूर्वी तिरंगा फडकविला म्हणून त्यांना झालेल्या शिक्षेच्या घटना या आजही जिवंत वाटतात. त्यातून प्रखर राष्ट्रनिष्ठा व्यक्त झाल्यानेच आज भारतीय माणूस स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहे. आज विविध संस्था, संघटनांची, पक्षांची एक ओळख म्हणून ध्वज वापरले जातात. त्यातील सर्वोच्च पद माझेच आहे. म्हणून मला माझा खूप अभिमान वाटतो. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, १ मे या राष्ट्रदिना- दिवशी तर माझी खूप काळजी घेतली जाते. अतिशय स्वच्छ, न चुरगाळता, न फाटलेला आणि सुलट असाच ध्वज फडकवला पाहिजे. अशी अट, असा कायदा असल्यामुळे माझी सर्वजण काळजी घेतात.
देशावर, राष्ट्रावर संकट आल्यास राष्ट्रध्वज अर्धाच फडकवला जातो. हुतात्मे, राष्ट्रीय नेते यांच्या पार्थिवर सुद्धा अभिमानाने गुंडाळले जाते. ज्यांनी आपल्या देशासाठी प्राण वेचले त्यांचा सन्मान वाढतो तो माझ्यामुळेच. मी संसदभवनापासून ते ग्रामपंचायत, विद्यापीठांपासून ते प्रत्येक शाळेत प्रेरणा देण्यासाठी आणि राष्ट्रनिष्ठेची जाणीव करून देण्यासाठी दिमाखात फडकत असतो. माझा अपमान हा देशाचा अपमान असतो. इतर देशात विविध क्रीडा स्पर्धेत आपले देशवासी माझ्या फडकण्यामुळेच ओळखतात की हे "आपले भारतीय आहेत." राष्ट्रकुलातील खेळ असो किंवा कोणती राष्ट्रीय परिषद असो. आपल्या देशाचे प्रतिनिधित्त्व न बोलता मीच तर करत असतो. जगाला मी उंच फडकवत हेच सांगतो की, माझा भारत महान आहे.'
माझे रक्षण करणे संपूर्ण भारतीयांचे आद्य कर्तव्य आहे. कारण मी भारतीयांच्या प्राणाहूनही प्रिय आहे. आता अलीकडे माझे प्लास्टिकच्या कागदापासून बनविलेले जे रूप आहे ते नको आहे कारण त्यामुळे प्रदूषणात भर पडते पण माझे कोणी एकतच नाही. असो, भारतासारख्या या महान देशात मला जे महत्त्व मिळाले आहे त्यामुळे मी धन्य झालो आहे, माझ्या जीवनाचे सार्थक झाले आहे.
इतक्यात टाळ्याचा कडकडाट झाला. प्रशालेतील स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. मी पुन्हा एकदा ताठ मानेने, अभिमानाने राष्ट्रध्वजाला सलामी दिली आणि म्हटले
भारत माता की जय।
वंदे मातरम।।
-समाप्त-
Comments
Post a comment