Skip to main content

रेडिओचे मनोगत essay in marathi । मराठी निबंधलेखन

 रेडिओचे मनोगत"  आत्मकथानात्मक मराठी निबंध"रेडिओचे मनोगत" हा एक आत्मकथानात्मक निबंध आहे. आत्मकथानात्मक निबंधात आपल्याला एखाद्या घडलेल्या गोष्टीचे वर्णन करायचे असते, त्या गोष्टीबद्दल माहिती सांगायची असते. खाली दिलेला "रेडिओचे मनोगत" हा निबंध आत्मकथानात्मक निबंधाचे एक उदाहरण आहे.

रेडिओचे मनोगत : मी रेडिओ बोलतोय...  

   आजकाल दूरदर्शन, संगणकाचे महत्त्व वाढत आहे. घराघरात दूरदर्शनचे संच आणि सुशिक्षित, व्यावसायिक, अभियांत्रिकी, ज्ञानसंपन्न घरात संगणकाचे वर्चस्व दिसत आहे. पूर्वी घराघरात दिसणारा रेडिओ आता जास्त दिसत नसला तरी आकाशवाणीचे, रेडिओचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आजही बहुतांश घरातील दिवसाची सुरुवात रेडिओवरील सुंदर अशा सनईवादनाने, त्याच्या नादमय आवाजाने आणि प्रसन्न वातावरणनिर्मितीने होत असते. रेडिओचा अजूनही श्रोतावर्ग, रसिकवर्ग चाहता आहे. त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारण्याची, आपले गुज व्यक्त करण्याची इच्छा मी एक रसिक, एक श्रोता म्हणून रेडिओने केली आणि मी रेडिओचे मनोगत ऐकू लागलो. 

   “आकाशवाणी पुणे-सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहे.” हे वाक्य ऐकून घराघरातील धांदल पाहून मी हसू लागतो, कारण सकाळचे सात वाजलेले असतात. कामावर जायची घाई, शाळेत जाण्यासाठीची तयारी असते, आईचा स्वयंपाक चालू असतो आणि कान मात्र सगळ्यांचे माझ्याकडे असतात. राज्यातल्या, देशातल्या घडामोडी घरबसल्या ऐकायला मिळत असतात आणि त्या ऐकण्याची इतकी सवय झालेली असते की, माझा आवाज जरी कोणी बारीक केला तर त्यांना फटके बसतात. असा मी घरातील अविभाज्य  भाग बनलेला आहे.  

  माझा शोध इटलीतील प्रसिद्ध शास्त्रज्ञ मार्कोनी यांनी लावला. माझ्यामुळे मनोरंजन होते. आपली आवड, संतवाणी, भक्तिगीत, भावगीत, सुगमसंगीत शास्त्रीय संगीत ऐकणाऱ्यांचे कान मी तृप्त करतो तर विनोद, नाटिका, नाट्यछटा, फार्स यातून खळखळून हसवतो. महानगरापासून ते अगदी दुर्गम अशा खेड्यापाड्यातील वाड्यावस्त्यांपर्यंत मी पोहोचलो आहे. मी ज्ञान आणि माहितीचा प्रसार करतो म्हणून मला प्रसार माध्यम असे म्हणतात. मी शासनाची ध्येयधोरणे, देशातल्या घडामोडी, काही सूचना सांगून जनजागृतीचे कार्य करतो. माझा फायदा लोकांना फार होतो. अगदी निरक्षर लोकांमध्ये सुद्धा जागृती निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य माझ्याशिवाय कोणी करून शकत नाही असे वाटते. अंधांना सुद्धा म्हणूनच माझा लळा लागतो.

    भारतात प्रथम १९२७ साली मुंबई आणि कोलकाता येथून माझी सेवा सुरू झाली. इ.स. १९३६ मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील 'ऑल इंडिया रेडिओ' ही सेवा सुरू झाली. सेवेस “आकाशवाणी' हे नाव दिले गेले. आकाशवाणीवरून एकाच वेळी एक संदेश लाखो लोकांपर्यंत पोहोचविता येतो.

    केवळ मनोरंजनाचेच मी साधन नसून त्याशिवाय शेती, विज्ञान, व्यापार, खेळ, साहित्य, राजकारण इ. ची माहिती सुद्धा मी देतो. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेबरोबर विविध प्रादेशिक भाषा व आंतरराष्ट्रीय भाषांमधून सुद्धा माहिती देण्याचे कार्य मी करतो.

     विद्यार्थ्यांसाठी शालेय कार्यक्रम, इतिहास, भूगोल, भाषा, शास्त्र इ. विषयी उपयुक्त माहिती, उदाहरणे, दाखले देऊन संपूर्ण विषयातील काठिण्य दूर करण्याचा मी प्रयत्न करतो. रात्रंदिवस मी जागाच असतो. मला विश्रांती नसतेच. जर तुम्ही विश्रांती दिली तरच मी गप्प बसतो. मला ठेवण्यासाठी मोठी जागा लागत नाही आणि एके ठिकाणी व्यवस्था करावी लागत नाही. तुम्ही जेथे जाल तेथे मी तुमच्यासोबत येऊ शकतो आणि तुमच्याशी बोलू शकतो. ना विजेची अडचण ना जागेची अडचण. अगदी तुमच्या खिशात, पर्समध्ये सुध्दा मी बसू शकतो. अगदी दुर्गम ठिकाणी, डोंगरदऱ्या कुठेही मी तुमची सोबत करू शकतो आणि तुमची करमणूक करून तुमच्या मनाची मरगळ दूर करू शकतो. अगदी गोर गरिबांच्या घरापासून ते श्रीमंताच्या घराघरातील रसिकांना माझे आकर्षण असते. माझ्या ऐकण्याने, बोलण्याने कोणताही दुष्परिणाम होत नाही उलट ज्ञानात भरच पडते. माझ्यामुळे कोणालाही त्रास होत नाही. मंद आवाजात आपला आवडता कार्यक्रम ऐकत हिरवळीवर आनंदाचे क्षण माझ्या सहवासात घालवल्यास तुमचा आनंद द्विगुणित होतो. वेळ कसा जातो, हे समजतच नाही.

     मी श्रोत्यांना नवनवीन ज्ञान तर देतोच, समाजप्रबोधनाचे कार्य करतोच परंतु त्याचबरोबर तुमच्या व्यवसायाची वृध्दी करण्यासाठी सुद्धा मदत करतो. मी वेगवेगळ्या जाहिरातीतून प्रत्येक वस्तूचे महत्त्व सांगतो. तसेच विविध कलावंताच्या मुलाखतीतून तुमची ओळख वाढवितो, मैत्री वाढवितो. नुसत्या आवाजावरून तुम्ही कलाकारांना ओळखता ही किमया मीच करू शकतो. मी सतत त्या आवाजाची तुम्हास ओळख करून दिल्यामुळे प्रत्येक कलाकार तुमच्या घरी येतो. आरोग्य, जागर, डॉक्टरांचा सल्ला यामुळे आरोग्याची काळजी तुम्ही घेता.  म्हणून  माझे स्थान घराघरात महत्त्वाचे आहे.

   बिस्मील्ला खानची सनई असो, लता दीदींचे गाणे असो किंवा किशोर-रफींची मोहक अदाकारी असो. तुमचे मन जिंकण्याची ताकद माझ्यात आहे. तुम्ही कितीही ताण तणावाखाली असाल तरीही माझी सोबत तुमचे ताण दूर करते. म्हणूनच मी घराघरातील रेडिओ, सखा आहे. मला दुर्लक्षित करू नका त्यामुळे तुमचेच नुकसान होईल. असे रेडिओ मला आपले मनोगत सांगत होता. मी मात्र गीतमाला ऐकतच त्याचे बोल समजून घेत होतो.

-समाप्त-

मित्रांनो "रेडिओचे मनोगत" या विषयावरचा निबंध तुम्हाला आवडला आहे का ? यातील काही गोष्टीत बदल करावा अस जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला खाली कॉम्मेंट करून नक्की सांगा.

!! धन्यवाद !! 

Also read : 

Comments

Popular posts from this blog

"व्यवसाय शिक्षण काळाची गरज " essay in marathi | मराठी निबंधलेखन

" व्यवसाय शिक्षण काळाची गरज "  वैचारिक मराठी निबंध " व्यवसाय शिक्षण काळाची गरज "  हा एक कल  वैचारिक निबंध   आहे. वैचारिक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीचे महत्त्व स्पष्ट करायचे असते, त्या गोष्टीची गरज सांगायची असते. खाली दिलेला " व्यवसाय शिक्षण काळाची गरज " हा  निबंध  वैचारिक निबंधाचे एक उदाहरण आहे   व्यवसाय शिक्षण काळाची गरज      भारत या आपल्या महान देशाला लोकसंख्येच्या विस्फोटाने घेरले आहे. बेकारी, रोजगाराचा प्रश्न प्रत्येक युवावर्गाला भेडसावत आहे. सुशिक्षित वर्ग नोकरीच्या मागे लागलेला आहे. कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी झालेली आहे. एकीकडे गुणवंतांची खाण आहे तर दुसरीकडे अज्ञानाचा अंधार आहे; मार्गदर्शनाचा अभाव आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आजच्या काळात व्यवसायाच्या माहितीचाच अभाव आहे. आजकाल शिक्षणातूनच व्यवसाय शिक्षणावर भर दिला जात आहे याचे ज्ञान प्रत्येकास पाहिजे. चाकाचा शोध लागला आणि मानवी जीवन गतिमान बनले. विविध व्यवसायांना चालना मिळाली, ग्रामीण भागात बारा बलुतेदार आपल्या व्यवसायातून निर्माण झाले आणि आज व्यवसाय निवडीची समस्या युवा पिढीसमोर उभी आहे. कोणत

"मी मुख्यमंत्री झालो तर... " essay in marathi | मराठी निबंधलेखन | कल्पनात्मक निबंध

  मी मुख्यमंत्री झालो तर...  कल्पनात्मक मराठी निबंध " मी मुख्यमंत्री झालो तर.. " हा एक  कल्पनात्मक निबंध  आहे. कल्पनात्मक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीची कल्पना करायची असते. खाली दिलेला " मी मुख्यमंत्री झालो तर.. " हा निबंध  कल्पनात्मक निबंधाचे  एक उदाहरण आहे.   मी मुख्यमंत्री झालो तर..कल्पनात्मक निबंध   विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता मुख्यमंत्री कोण होणार  या घटनेकडे लागून राहिले. प्रत्येक जण आपापला प्रयास करू लागले. सत्ताधारी पक्षातील दिग्गजांची नावे चर्चेत येऊ लागली असताना मलाही असे वाटले की मुख्यमंत्र्याचे पद किती महत्त्वाचे आहे, गौरवाचे आहे आणि मानाचे आहे. तो सन्मान आपल्याला मिळाला तर...मी मुख्यमंत्री झालो तर... या विचारात मी रंगून गेलो.   भारतातील एक महत्त्वाचे राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळणे ही सामान्य बाब नसते. महाराष्ट्रातील सर्वांची मुख्यमंत्र्यांकडून खूप अपेक्षा असते. हे पद अतिशय जबाबदारीचे असते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या यादीत माझे नाव सामील होणार याचा मला

वाचन एक छंद essay in marathi | मराठी निबंधलेखन | वैचारिक निबंध

  वाचन एक छंद  वैचारिक मराठी निबंध वाचन एक छंद "  हा एक कल  वैचारिक निबंध  आहे. वैचारिक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीचे महत्त्व स्पष्ट करायचे असते, त्या गोष्टीची गरज सांगायची असते. खाली दिलेला " वाचन एक छंद " हा  निबंध  वैचारिक निबंधाचे एक उदाहरण आहे.   वाचन एक छंद निबंध      'मला एखादे छानसे पुस्तक किंवा त्यातील उतारा वाचल्याशिवाय झोपच येत नाही', सकाळी वर्तमानपत्र वाचल्याशिवाय दिवसाची सुरूवात चांगली झाली असे वाटत नाही. अशा प्रकारची मनोगते आपण ऐकतो. 'व्यक्ती तितक्या प्रकृती' या उक्तीप्रमाणे प्रत्येकाचे छंद वेगवेगळे असतात. त्यापैकी 'वाचन' हा माझा छंद आहे.  माणसाच्या या महासागरात प्रत्येक जण आपापल्या छंदाची जोपासना मोत्याप्रमाणे करत असतो. प्रत्येकाला कुठला ना कुठला छंद असतोच, परंतु इतर छंदापेक्षा 'वाचन' हा छंद मला आईने सांगितलेल्या कथांमुळे आवडू लागला. आईने वाचनाची सवय लावली, आणि मी वाचतच आहे. मानवाच्या सर्वांगीण विकासात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक प्रगती होत असते ती वाचनामुळे. सुसंस्कारी, सत्शील, चांगल्या चारित्र्याच्या जीवन