"व्यवसाय शिक्षण काळाची गरज" वैचारिक मराठी निबंध
व्यवसाय शिक्षण काळाची गरज
भारत या आपल्या महान देशाला लोकसंख्येच्या विस्फोटाने घेरले आहे. बेकारी, रोजगाराचा प्रश्न प्रत्येक युवावर्गाला भेडसावत आहे. सुशिक्षित वर्ग नोकरीच्या मागे लागलेला आहे. कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी झालेली आहे. एकीकडे गुणवंतांची खाण आहे तर दुसरीकडे अज्ञानाचा अंधार आहे; मार्गदर्शनाचा अभाव आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आजच्या काळात व्यवसायाच्या माहितीचाच अभाव आहे. आजकाल शिक्षणातूनच व्यवसाय शिक्षणावर भर दिला जात आहे याचे ज्ञान प्रत्येकास पाहिजे. चाकाचा शोध लागला आणि मानवी जीवन गतिमान बनले. विविध व्यवसायांना चालना मिळाली, ग्रामीण भागात बारा बलुतेदार आपल्या व्यवसायातून निर्माण झाले आणि आज व्यवसाय निवडीची समस्या युवा पिढीसमोर उभी आहे. कोणता व्यवसाय निवडावा? आणि का निवडावा? हे त्यांना समजत नाही. केवळ नोकरीच्या मागे न लागता प्रत्येक तरुणांनी व्यवसाय शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे. कारण ती आजच्या काळाची गरज आहे.
आजच्या शिक्षण पध्दतीतून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी आपल्या जीवनात यशस्वी होतोच असे नाही. त्यांना त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट गवसत नाही. ध्येयहीन जहाज हेलकावत त्यांचा प्रवास चालू असतो. सुशिक्षित मुलांना काम येत नाहीत, कष्ट करावे वाटत नाहीत. एखादे काम मिळाले की त्यास नावे ठेवून मोकळे होतात. त्यापेक्षा न शिकलेला, कष्ट करणारा, शेतात राबणारा माणूस सुखासमाधानाने जगू शकतो. त्यासाठीच स्वयंरोजगाराची, व्यवसाय शिक्षणाची गरज आहे.
आज आपल्या भारतात व्यवसाय करून जगात लौकिक मिळविलेल्या कंपन्या स्वयंरोजगारातूनच उदयास आलेल्या आहेत. टाटा, बिर्ला असो, रिलायन्स असो, किर्लोस्कर असो अशा मोठमोठ्या कंपन्या व्यावसायिकास मार्गदर्शक आहेत. विविध क्षेत्रांत विविध व्यवसाय विकसित झालेले आहेत. वैद्यकीय क्षेत्र, वाणिज्य क्षेत्र, शेती क्षेत्र, गृहशास्त्र, तंत्रज्ञान, मत्स्य व्यवसाय प्रत्येक क्षेत्रात व्यवसायाच्या भरपूर संधी आहेत; दहावी आणि बारावीनंतर व्यवसाय शिक्षणाच्या भरपूर संधी आहेत; परंतु त्यासाठी लोकांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. व्यवसाय शिक्षण घेण्यात रस असला पाहिजे. व्यवसाय शिक्षणात भरपूर फायदा आहे. टोमॅटो सॉस, जॅम, जेली, लोणची, पापड आदी पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ, स्टेशनरी, वस्तू तयार करणे, आय.टी.आय. मधून मिळणारे ज्ञान व विविध कोर्सेस, संगणक क्षेत्रातील कोर्सेस अशा कोणत्याही व्यवसायाची निवड केली, आत्मविश्वासाने, जिद्दीने, कष्टाने, प्रयत्नपूर्वक व्यवसाय केल्यास निश्चित यशप्राप्ती होते. कुणीही बेकार राहणार नाही. बेकारीतूनच विविध प्रश्न, समस्या निर्माण होतात.
एखाद्या शिलाई मशिनचा वापर करून जीवन यशस्वीपणे जगणारे टेलर, कोणतीही मशिन दुरुस्त करण्याचे ज्ञान असलेला माणूस बेकार राहत नाही, उपाशी राहत नाही. व्यवसाय करणाऱ्यांमध्ये जिद्द हवी, नवनिर्मितीची इच्छा हवी, व्यावहारिक ज्ञान हवे, निर्णयक्षमता हवी, बोलण्याची कला असावी. आणि दूरदृष्टी असावी. या सर्व गुणांनी युक्त असलेला व्यावसायिक, मालक आपला व्यवसाय यशस्वीपणे सांभाळेल, अर्थार्जनसुध्दा व्यवस्थित करेल.
आज आपल्या महाराष्ट्रात जवळजवळ ६० ते ७० लाख पदवीधर आहेत, त्यांना नोकरी पाहिजे परंतु सरकार एवढ्या मोठया संख्येने रोजगार किंवा सेवा देऊ शकत नाही. याचा विचार करून बेकार राहण्यापेक्षा, वाममार्गाला लागण्यापेक्षा, जीवन उद्ध्वस्त होण्यापेक्षा एखादा उद्योग, व्यवसाय करावा. 'जो उद्योग करतो त्यास ईश्वर सहाय्य होतो' म्हणून सतत प्रयत्न केले पाहिजेत, व्यवसाय शिक्षण घेतले पाहिजे.
-समाप्त-
Comments
Post a comment