मी मुख्यमंत्री झालो तर... कल्पनात्मक मराठी निबंध
मी मुख्यमंत्री झालो तर..कल्पनात्मक निबंध
विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता मुख्यमंत्री कोण होणार या घटनेकडे लागून राहिले. प्रत्येक जण आपापला प्रयास करू लागले. सत्ताधारी पक्षातील दिग्गजांची नावे चर्चेत येऊ लागली असताना मलाही असे वाटले की मुख्यमंत्र्याचे पद किती महत्त्वाचे आहे, गौरवाचे आहे आणि मानाचे आहे. तो सन्मान आपल्याला मिळाला तर...मी मुख्यमंत्री झालो तर... या विचारात मी रंगून गेलो.
भारतातील एक महत्त्वाचे राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळणे ही सामान्य बाब नसते. महाराष्ट्रातील सर्वांची मुख्यमंत्र्यांकडून खूप अपेक्षा असते. हे पद अतिशय जबाबदारीचे असते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या यादीत माझे नाव सामील होणार याचा मला अभिमान वाटला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर शरद पवार, मनोहर जोशी आणि विलासराव देशमुख यांच्यापर्यंत अनेकांनी आपापल्या कर्तृत्वाचा ठसा मराठी मातीत उमटवला. आपल्या कार्याने मराठी माणूस कर्तबगार आणि प्रयत्नशील आहे, हे दाखवून दिले आणि आता तर मीच मुख्यमंत्री झालो आहे. माझ्यासमोर तर इतकी आव्हाने आहेत की, ती सोडविण्याचा मी आटोकाट प्रयत्न करणार आहे.
मी मुख्यमंत्री झालो तर, महाराष्ट्रातील सद्यस्थितीत भेडसावणारे जे प्रश्न आहेत ते सोडविण्याचा प्रयत्न करेन. बंद पडलेले कारखाने चालू करेन, काम नसलेल्या हाताना काम देईन, बेकारी आणि रोजगाराचा प्रश्न सोडवेन. लोकसंख्यावाढीमुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे त्यावर कठोर निर्णय घेऊन अंमलबजावणी करेन साथीचे रोग पसरणार नाहीत यासाठी आरोग्य खाते सक्रिय करने, प्रदूषणाचा प्रश्न सध्या संपूर्ण जगाला भेडसावत आहे. उपाययोजना देशभरात आणि जगभरात केली जात असताना माझा महाराष्ट्र मागे राहणार नाही याची मी काळजी घेईन. "झाडे लावा झाडे जगवा," "पर्यावरणाचे रक्षण करा" असे केवळ न बोलता मी स्वतः वृक्षारोपण करून वृक्षसंगोपनाची, वृक्षसंरक्षणाची जबाबदारी घेईन. अधिकार, पद, प्रतिष्ठा आणि सत्ता व उपलब्ध पैसा यांचा विनियोग सत्कार्यासाठी करेन. शेती हा आपला प्रमुख व्यवसाय, परंतु शेतकरी सध्या अडचणीत आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्यासाठी मी शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवेन, शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे म्हणून शेतीतून थेट माल ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यातील दलाली कमी करेन, शेतकऱ्यांची पिळवणूनक थांबवेन. दलाल लोक शेतमालात भेसळ करतात, ग्राहकांची फसवणूक करतात ती मी दूर करेन. ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या उत्पन्नातूनच जोडव्यवसायाचे प्रशिक्षण देईन. उदा. तेलघाणे, दाळी तयार करणे, लोणचे, जॅम, जेली तयार करणे, दुग्धजन्य पदार्थ तयार करणे जेणेकरून ग्रामीण युवकाला काम मिळेल.
सध्या पावसाचे स्वरूप अनियमित व अनिश्चित आहे. त्यासाठी जलसिंचन प्रकल्प वाढवेन, लहान लहान धरणे, शेततळी, पाझर तलाव, मोठे प्रकल्प, पाणी अडवा पाणी जिरवा असे प्रकल्प राबवेन, यात कोठेही भ्रष्टाचार होणार नाही याची काळजी घेईन. त्या प्रकल्पामुळे महापूर येणार नाही आणि दुष्काळ असेल तर पाणी पुरवठा होईल. तसेच नद्या जोडणी प्रकल्प करून संपूर्ण महाराष्ट्राचा पाणी प्रश्न सोडवेन.
मी मुख्यमंत्री झालो तर शिक्षण क्षेत्रावर जास्त भर देईन. आदिवासी भागात, ग्रामीण व मागास भागात शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देईन. सुशिक्षित, अनुभवी तज्ञ शिक्षकांच्या नेमणुका करून ज्ञान देण्याचा प्रयत्न करेन. गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न करेन. पुन्हा गुणवत्ता यादी सुरू करेन. शिक्षण क्षेत्रात कोणत्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही आणि कोणावरही अन्याय होणार नाही याची मी दक्षता घेईन.
मुख्यमंत्री हा मंत्रिपरिषदेचा प्रमुख असतो. मंत्रिपरिषदेच्या कमानीची अधारभूत मुख्यशिला असतो. तोच आपल्या निवडून आलेल्या सदस्यांमधून विविध खात्यांचे प्रमुख नेमतो. त्याप्रमाणे मीसुद्धा प्रत्येक खात्यावर जबाबदार आणि क्रियाशील मंत्र्याची नेमणूक करून महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्याची संधी देईन. मंत्रिपरिषदेत झालेल्या निर्णयाची माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात इतर खंडातील उपयुक्त ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान महाराष्ट्रात आणून महाराष्ट्राचा विविध क्षेत्रात विकास घडवून आणेन. महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक प्रगती ही इतर राज्यांना प्रेरणादायी ठरेल असा बदल घडवून आणेन. विज्ञानाच्या क्षेत्रात शास्त्रज्ञांच्या, डॉक्टरांच्या वैचारिक प्रगतीला, संशोधनाला प्रोत्साहन देईन. सर्व क्षेत्रातील मान्यवरांचा, मार्गदर्शकांचा यथोचित सत्कार करेन. राजकारणावरचा लोकांचा विश्वास उडत चाललेला आहे. त्यापेक्षा एका आदर्श राज्याचे स्वप्न मी साकार करेन. साहित्य, कला, अभिनय, अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी विविध योजना व पुरस्कारांची घोषणा करेन.
-समाप्त-
मित्रांनो "मी मुख्यमंत्री झालो तर.." या विषयावरचा निबंध तुम्हाला आवडला आहे का ? यातील काही गोष्टीत बदल करावा अस जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला खाली कॉम्मेंट करून नक्की सांगा.
!! धन्यवाद !!
Comments
Post a comment